पंढरपुरातील चंद्रभागेच्या नदीपात्रात बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू
भोकरदन तालुक्यातील दोन सख्या चुलत जावांचा समावेश

भोकरदन:
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागेच्या नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यातील दोन महिला भाविक या भोकरदन तालुक्याच्या धावडा गावातील रहिवासी असून, त्या नात्याने सख्या चुलत जावा होत्या. संगीता संजय सपकाळ (४०) सुनिता महादेव सपकाळ (४३) असे बुडून मृत पावलेल्या महिला भाविकांचे नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा येथील काही महिला भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गेल्या होत्या. शनिवारी (ता.१९) पहाटे विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे म्हणुन अगोदर त्या चंद्रभागेच्या नदीपात्रात आंघोळीसाठी उतरल्या असता त्यांना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक नदीपत्रात बुडाल्या यातील दोन महिला भाविकांचे मृतदेह हाती लागले असून, इतर एक अनोळखी महिला भाविकाचा शोध सुरू आहे. सध्या उजनी धरणातून चंद्रभागेच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही. दरम्यान या घटनेने भोकरदन तालुक्यावर शोककळा पसरली आहे.