गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचे सानुग्रह अनुदान आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते अपघातग्रस्तांच्या वारसांना वाटप

भोकरदन : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत भोकरदन तालुक्यातील 40 तर जाफ्राबाद तालुक्यातील 8 अशा एकूण 48 अपघातग्रस्तांच्या वारसांना 95 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मा.जि.प. सदस्या सौ. आशाताई पांडे, जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटील ठाले, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार संतोष दानवे म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांचे जीवन हे अनेक संकटांनी ग्रासलेले असून त्यातील प्रमुख संकट म्हणजे अपघात आहे. अपघातामुळे शेतकरी मृत्यू पावला वा त्यास अपंगत्व आले तर त्याच्या संपूर्ण कुटुंबास आर्थिक समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना या संकटातून वाचवण्यासाठी “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. कुटुंबातील करता माणूस हरपल्याचे दुःख शब्दात व्यक्त करणे अशक्य असून, शासनाच्या वतीने देण्यात येणारी आर्थिक मदत ही त्याची नुकसान भरपाई होऊ शकत नाही. परंतु अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाची ही आर्थिक मदत या कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.