दुचाकी अपघातात जाफराबाद तालुक्यातील शिक्षक ठार
भोकरदन जाफराबाद रस्त्यावरील आसई पाटीजवळ घडला अपघात

जालना:
दुचाकी अपघातात जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (ता.२४) गुरुवार रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद मुख्य रस्त्यावरील आसई पाटीजवळ घडली. दुर्गेश सुखदेव नवले असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लिटिल स्टार इंग्लिश स्कूल माहोरा शाळेचे अध्यक्ष प्रा.दुर्गेश सुखदेव नवले हे काही कामानिमीत्त गुरुवारी भोकरदन येथे आले होते. गुरुवारी रात्री ते काम आटोपून दुचाकी मोटारसायकलने जाफराबाद तालुक्यातील डावरगाव (देवी) या त्यांच्या गावी जात असताना भोकरदन जाफराबाद मुख्य रस्त्यावरील आसई पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रा.दुर्गेश नवले यांच्यावर त्यांच्या मूळ गावी डावरगाव देवी येथे शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.