बस दुचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार
भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ घडली घटना

भोकरदन:
बस व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकी वरील दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना (ता.२५) शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भोकरदन जालना मुख्य मार्गावरील केदारखेडा गावाजवळ घडली. विकास किशोर जाधव (वय २१) चंदनझिरा,जालना व भुषण लोखंडे (वय २३) अवघडराव सावंगी ता.भोकरदन असे या अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विकास जाधव आणि भूषण गंजराम लोखंडे जालन्याहून भोकरदनकडे दुचाकीने येत होते. तर एसटी महामंडळाची मानव विकास बस विद्यार्थिनींना घेऊन भोकरदनहून संगमेश्वरकडे जात होती. भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील केदारखेडा गावातील असलेल्या हॉटेल वैभव जवळ दोन्ही वाहनात समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर रक्ता-मासांचा सडा पडला होता. दोघांचेही मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश..
दरम्यान या अपघाताची माहिती मृत तरुणांच्या नातेवाईकांना मिळतात त्यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी मृतदेह बघून नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. या घटनेची माहिती शहरात पसरल्याने ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.