बारामतीत नियतीचा क्रूर खेळ? कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू ; आजोबांनीही सोडले प्राण.!
"माझ्या मुलींना बघा त्यांना काही झालं नाही ना"..!

बारामती: बारामतीत एका भरधाव डंपरने एकाच कुटुंबातील तीन जणांचा बळी घेतला. हा केवळ अपघात नसून या घटनेने अख्ख कुटूंब उध्वस्त करून टाकलं आहे. या अपघाताची बातमी ऐकून जबर धक्का बसल्याने परिवारातील आजोबांनीही प्राण सोडले. केवळ दोन दिवसांत एकाच कुटुंबातील तब्बल चार जण आता या जगातून कायमचे निघून गेले आहे. त्यामुळे आचार्य परिवाराचे क्षणात होत्याचे नव्हते झाले. या घटनेने बारामतीच नव्हे तर संपुर्ण राज्य हळहळले असून, खरचं नियती इतकी कशी क्रूर होऊ शकते हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे.
वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे ओंकार आचार्य हे रविवारी बारामती मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारास वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबानगर येथील चौकात थांबले होते. शाळेतून मुलगी सईला घेऊन परतताना एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ओंकार राजेंद्र आचार्य (वय ३६) आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली सई (वय १०) आणि मधुरा (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दु:खद घटना घडली. मुलगा आणि नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. या घटनेमुळे आचार्य कुटुंब अक्षरशः हादरून गेले आहे. डंपर चालक दशरथ दत्तात्रय डोळे याला पोलिसांनी अटक केली असून, बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
“माझ्या मुलींना बघा त्यांना काही झालं नाही ना”.. ओंकार आचार्य यांच्या अखेरच्या शब्दाने मन सुन्न
अपघात एका बापाच्या कंबरेचा अर्धा भाग मोठ्या डंपरच्या चाका खाली पुर्ण चेंदा मेंदा झालेला असताना सुद्धा तो बाप त्याच्या जीवाची घालमेल फक्त बाजुला पडलेल्या त्याच्या लेकरांसाठी करीत होता. मरणाला काही सेकंद बाकी असतांना गंभीर जखमी असलेले ओंकार शांत पणे म्हणाले, “माझ्या मुलींना बघा त्यांना काही झालं नाही ना” काय तो बाप, केवढ्या वेदना होत असतील परंतु त्याच काळीज फक्त लेकरांन साठी धडपडत होतं,त्याचा मृत्यूला काही सेकंद बाकी असताना येवढ्या वेळेत पण तो आपला जीव सोडून उभा होता. निपचित पडलेल्या पोटच्या दोन लेकरांसाठी शेवटपर्यंत लढतो .. आणि शेवटी जीव सोडतो …अशी वाईट वेळ कोणावरही कधी येऊ नये.
आजोबा दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतले होते घरी..
राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. ते महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. मात्र, मुलगा आणि नातींच्या अकाली मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. सोमवारी त्यांचे निधन झाले. आचार्य यांच्यामागे पत्नी शैलजा, मुलगा अमोल आणि सून अरुणा हे आहेत. या घटनेबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
…………………