जालन्यात संतापजनक प्रकार..! क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग
संशयीत क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जालना : जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील चार विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात पोलिस आणि शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर अखेर या क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो.याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती. शिक्षण विभागानं देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली होती. सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.