जिल्हा प्रशासनाची दोरी सावित्रीच्या लेकींच्या हाती!
जालना : आशिमा मित्तल नव्या जिल्हाधिकारी ; सीईओ म्हणून मिन्नू पी.एम.यापूर्वीच रुजू

जालना :
दोन वर्षांपूर्वी जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती मिळालेले डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी म्हणून मित्तल या देखील प्रथमच जबाबदारी घेणार आहेत. दरम्यान, महिनाभरापूर्वी मिन्नू पी.एम.यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या मुख्य प्रशासनाच्या दोरी सावित्रीच्या लेकींच्या हातात आल्या आहे.
दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ रुजू झाले होते, यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा करभार सांभाळला होता. डॉ. पांचाळ यांना जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी मिळाल्याने आणि मुळातच मितभाषी स्वभावाच्या डॉ. पांचाळ यांनी सावधपणे भूमिका घेऊन कारभार केला. त्यांच्या कार्यकाळातील दोन वर्षात त्यांनी मराठा – ओबीसी आरक्षणाच्या मागणीमुळे जिल्ह्यातील चिघळलेल्या सामाजिक संघर्षाला व्यवस्थितपणे हाताळले. दरम्यान, ते तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील अशी अपेक्षा असतानाच बुधवारी (ता.३०) जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी डॉ. पांचाळ यांच्या जागी आशिमा मित्तल यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. डॉ. पांचाळ यांची पदस्थापना कुठे करण्यात आली याबाबत मात्र, आदेशात उल्लेख केलेला नाही. दरम्यान आता जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली असून, महिनाभरापूर्वी मिन्नू पी.एम.यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या मुख्य प्रशासनाच्या दोरी सावित्रीच्या लेकींच्या हातात आल्या आहे.