ताज्या घडामोडी

जालना जिल्हाधिकारी म्हणुन आशिमा मित्तल यांनी स्विकारला पदभार

जालना (जिमाका) :- जालना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या श्रीमती आशिमा मित्तल यांनी शुक्रवार दि.1 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणुन काम करत असतानी श्रीमती मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आयआयटी मुंबई येथून बी.टेक. सिव्हिल इंजिनियरींग केली असुन यामध्ये त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी या क्षेत्रातही काम केले आहे. तसेच त्यांचे मानववंशशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. श्रीमती मित्तल यांनी सन 2017 ची भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली असून त्या देशात 12 व्या स्थानी होत्या. 2018 साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात रुजू झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी म्हणुन काम केले आहे. तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणुन कामकाज पाहिले आहे. श्रीमती मित्तल यांनी शालेय दिवसात राष्ट्रीय प्रतिभा शोध चाचणी (NTSE), किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KYPY) सारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी बहुराष्ट्रीय (MNC) कंपनीमध्ये काम केले आहे. सामाजिक सेवेच्या भावनेतून त्यांनी अनेक एनजीओमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून सामाजिक बदलांबद्दल त्या आग्रही आहेत. त्यातूनच त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली. श्रीमती मित्तल यांच्या संकल्पनेतून सुपर 50 उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व खुल्या प्रवर्गातील एकूण 200 विद्यार्थ्यांना JEE/CET व NEET परीक्षांसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातील 22 विद्यार्थ्यांनी JEE main परीक्षा उत्तीर्ण केली आहे, यातील 7 विद्यार्थ्यांनी JEE advance परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे आयआयटीएन बनविण्याचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक जिल्हा हा राज्यात प्रथम आला असून सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक निमित्त गठीत समितीतर्फे भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धा’ आयोजित केली होती या निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी जिल्हा श्रेणीमध्ये नाशिक जिल्ह्याचा ‘प्रथम’ क्रमांक आला असल्याने याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे आयोजित गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कार्यालयीन सुधारणा या उपक्रमात नाशिक जिल्हा परिषदेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून दि.7 मे 2025 रोजी श्रीमती आशिमा मित्तल यांचा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग यांच्याकडून कुपोषण निर्मूलन व बालकांसाठी राबवलेल्या अभिनव उपक्रमांमुळे सन 2023 व सन 2024 असा सलग 2 वर्ष बालस्नेही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. श्रीमती मित्तल यांनी Anthropology या विषयात मास्टर्स केले आहे. नाशिक जिल्ह्यातील 3030 स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना विजजोडणीसाठी विशेष मोहीम हाती घेऊन सर्व अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी उपलब्ध केल्याने राज्याचे एकात्मिक बालविकास सेवा योजना मा. आयुक्त यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे अभिनंदन करण्यात आले असून नाशिक जिल्ह्याचा आदर्श घेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्रीमती मित्तल यांचा प्रदीर्घ अनुभव जालना जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच उपयोगी येणार आहे.

संपुर्ण माहिती (जिल्हा माहिती कार्यालय जालना)

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.