भाजप प्रवेशावरून खोतकर, गोरंट्याल यांच्यात खडाजंगी!
वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपासह "आरे,कारे"

जालना: काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच मुंबईत गाजा वाजा करून भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. प्रवेशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले.चर्चेदरम्यान एकमेकांवर टीका करताना दोघांनी अनेकदा एकमेकांना “आरे कारे” ची भाषा वापरली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानल्या जातात. याचा प्रत्यय अनेक निवडणुकीत कित्येकदा जिल्ह्यातील जनतेला आलेला आहे. कैलास गोरंट्याल यांना शेरो- शायरी करण्याची आवड आहे. ज्यावेळी आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले कैलास गोरंट्याल यांनी “पन्नास खोके एकदम ओके” अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. तेंव्हापासून ही घोषणा सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. शिवाय या घोषणेच्या माध्यमातून विरोधकांनी अनेकदा शिंदे सेनेच्या आमदारांना जेरीस आणल्याचे त्यावेळी दिसून आले होते. असे असताना आता “पन्नास खोके एकदम ओके” या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्याचे विद्यमान आमदार आणि कैलास गोरंट्याल यांचे कट्टर राजकीय विरोधक अर्जुन खोतकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी खरे गद्दार कोण?हे आता जनतेला मतदारांना समजल्याचे सांगत कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असताना शुक्रवारी रात्री एका वृत्तवाहिनीने या दोन्ही नेत्यांना एकत्रीत घेत घोषणा, प्रवेश, व्हायरल व्हिडिओ आदी विषयांवर चर्चा सुरू केली. ही चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांचा संयम सुटला त्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपासह आरे कारेची भाषा वापरणे सुरू केल्याचे दिसून आले. मुलाखतीत झालेली खडाजंगीची चर्चा आता जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांमध्ये किती राजकीय कटूता आहे हे देखील जिल्ह्यातील जनतेला कळाले आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोरंट्याल यांच्या प्रवेशाची खेळी कोणाची…?
कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या प्रवेशामागे कोणाचे डावपेच आणि कोणाची नीती याचा सखोल विचार होतो आहे. गोरंट्याल यांनी स्वतःच सांगितले की, “भाजपमधील काही नेते अनेक दिवसांपासून मला पक्षात यावे म्हणून आग्रह करत होते.” या नेत्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांचे नाव त्यांनी स्पष्टपणे घेतले. यातच खरा प्रश्न उभा राहतो — ही खेळी नेमकी कोणाची? रावसाहेब दानवे यांची राजकारणातील चतुराई, संयम, योग्य वेळी योग्य मांडणी, आणि योग्य क्षणी “चकवा” देण्याची हातोटी सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेकदा विरोधकांनाच नव्हे तर पक्षातील काहींनाही त्यांच्या राजकीय चालींनी चकित केले आहे.गोरंट्याल यांचा प्रवेश म्हणजे जणू “सावज हेरून वेळीच फास आवळणं” याचे उत्तम उदाहरण ठरते का? की हा प्रवेश एखाद्या मोठ्या राजकीय पुनर्रचनेचा भाग आहे? एका गोष्टीवर मात्र कोणाचं दुमत नाही — रावसाहेब दानवे यांनी ही खेळी खेळली असेल तर ती नक्कीच विचारपूर्वक आणि दूरगामी परिणाम साधणारी ठरू शकते.