
भोकरदन: भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावाचा रहिवासी व भारतीय सैन्य दलात झारखंड येथे कार्यरत असलेला वीर जवान भोकरदन जालना मुख्य मार्गावरील सोयगाव देवी पाटीजवळ झालेल्या अपघातात ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता.७) रात्री १० वाजेदरम्यान घडली. अमोल पंडीत दळवी (वय ३५) असे या अपघातात ठार झालेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमोल पंडीत दळवी हे झारखंड येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून आठ दिवसांपूर्वी ते सुट्टी घेऊन गावी आले होते. दरम्यान गुरुवारी ते गारखेडा देवी येथे त्यांच्या नातेवाईकाकडे कामानिमीत्त गेले होते. गुरुवारी रात्री ते भोकरदनकडे येत असताना भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळ भोकरदनकडून जालन्याला जाणाऱ्या आयशर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात अमोल दळवी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुटुंबाचा आधार हरवला…
अंदाजे २५ वर्षांपूर्वीच अमोल दळवी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या आईने अत्यंत बिकट परिस्थितीत अमोल यांचा सांभाळ केला. आता अमोलने घरातील कर्ता व एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली होती. अमोलचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने पत्नी व दोन लहान मुलांचे छत्र हरपले असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोककळा पसरली असून परिसरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.