राखीच्या सणाला पावसाची नजर – बाजारपेठेत अपेक्षित ग्राहकी नाही

भोकरदन : बहिण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण उद्या (ता.८) साजरा होणार आहे. यासाठी भोकरदन शहरातील बाजारपेठा सध्या रंगीबेरंगी राख्या, सजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तूंनी उजळून निघाल्या आहेत. दुकाने, फूटपाथवरील स्टॉल्समध्ये बहारदार राख्यांचा मळा पाहायला मिळत आहे. पारंपरिक रेशमी राख्यांपासून ते आधुनिक डिझायनर राख्यांपर्यंत, लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर राख्या विक्रीसाठी आल्या आहेत.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम रक्षाबंधनाच्या सणावरही स्पष्टपणे जाणवत आहे. नेहमीप्रमाणे या काळात बाजारपेठा गजबजलेल्या असतात, मात्र यावर्षी राख्या, गिफ्ट पॅक्स, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंची विक्री मंदावली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतकरी वर्ग आणि ग्रामीण ग्राहकांकडून खर्च करण्याची तयारी कमी दिसत आहे. पारंपरिक आणि डिझायनर राख्यांसाठी काही प्रमाणात शहरातील ग्राहक प्रतिसाद देत असले तरी ग्रामीण भागातून येणारी मोठी खरेदी यंदा घटली आहे. मिठाई व भेटवस्तूंच्या ऑर्डर्सही मागील वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. तरीही, व्यापाऱ्यांना आशा आहे की, ग्राहकांचा ओघ वाढेल आणि मंदावलेली बाजारपेठ पुन्हा रंगतदार होईल.