अंगारिका चतुर्थी निमित्त राजुर गणपतीकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर गणपती येथे अंगारिका चतुर्थीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही (ता.१२) मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा योग आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले असून, या काळात या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर गणपती येथे प्रत्येक चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात. याशिवाय मंगळवारी येणाऱ्या अंगारिका चतुर्थीला भाविकांची गर्दी लक्षणीय असते. पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भोकरदन, जालना,जाफराबाद, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा, याशिवाय विदर्भ, मराठवाडा व खानदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामळे भाविकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राखणे आणि पायी येणाऱ्यांना अडथळा न येण्यासाठी राजुरकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वाहतूक बदलाबाबत सूचना देण्यासाठी मार्गदर्शक फलक, पोलिस पथके व स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी संयम व शिस्त पाळावी, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे…
१) भोकरदन चौफुली जालना येथून राजुर, भोकरदन कडे जाणाऱ्या जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगांव राजा, जाफ्राबाद, माहोरा मार्गे भोकरदन कडे जातील व येतील.
२) भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून राजुर मार्ग जालना कडे येणारे जड वाहनधारक (भक्तांची वाहने वगळून) माहोरा, जाफ्राबाद, देऊळगांव राजा या मार्गाने जालना कडे जातील व येतील.
३) दाभाडी कडून राजूर मार्गे भोकदन कडे जाणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) हसनाबाद मार्गे भोकरदन क जातील व येतील.
४) टेंभुर्णी कडून राजूर मार्गे जालना कडे येणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगाव राजा मार्ग जालना क जातील व येतील.
५) टेंभुर्णी कडून राजूर मार्गे भोकरदन कडे जाणारे जड वाहनधाक हे (भक्तांची वाहने वगळून) जाफ्राबाद-माहोरा मार्गे भोकरद कडे जातील व येतील.
वरील मार्गाची जड वाहतुक दिनांक ११ ऑगस्ट रोजीचे ८ वाजेपासून दिनांक १३ ऑगस्ट रोजीचे ८ वाजेपर्यंत बदल करण्यात आलेला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.