दोन दिग्गज, एक हृदयस्पर्शी क्षण – सांत्वनातही उमटला आपुलकीचा रंग.!
माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बदामराव पंडीत यांची भेट

भोकरदन: भोकरदन शहरात रविवारी (ता.१०) रात्री एक भावनिक आणि राजकीय रंग असलेला प्रसंग घडला. शहरातील देशमुख गल्ली येथील राम भैय्या देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रकलाबाई भिकानराव देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या निवासस्थानी आले होते.
विशेष म्हणजे, दिवंगत चंद्रकलाबाई या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी मंत्री बदामराव पंडीत यांच्या भगिनी तसेच माजी नगरसेवक प्रा. रणवीरसिंह देशमुख यांच्या काकू होत. रावसाहेब दानवे यांचे देशमुख कुटुंबीयांशी जुने आणि घट्ट नाते असल्याने त्यांची उपस्थिती केवळ औपचारिकतेपुरती न राहता, ती भावपूर्ण झाली.
नेमके याच वेळी माजी ग्रामविकास मंत्री बदामराव पंडीत देखील भोकरदन येथे उपस्थित होते. त्यामुळे या प्रसंगी दोन दिग्गज नेत्यांची एकत्र भेट झाली. सांत्वनाच्या वातावरणातही दोघांनी आपुलकीने संवाद साधला, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि भूतकाळातील राजकीय तसेच वैयक्तिक नात्यांच्या आठवणींमध्ये रमले.
देशमुख कुटुंबियांचे राजकारणातील योगदान, गेवराई-जालना मतदारसंघातील राजकीय चढउतार, कार्यकर्त्यांचे किस्से आणि निवडणुकीतील अनुभव – या सगळ्यावर दोन्ही नेत्यांत हलक्या फुलक्या गप्पा रंगल्या.
या भेटीने स्थानिक राजकारणात चर्चेचा नवा विषय निर्माण केला असून, “जुनी नाती कधीही फिकी होत नाहीत” याची जाणीव सर्वांना झाली. सांत्वनाचा प्रसंग असला तरी त्यातही मैत्री, सन्मान आणि जुन्या ओळखींचा ऊबदार भाव स्पष्ट जाणवत होता. यावेळी युवा नेते रोहित भैया पंडित, राम भैय्या देशमुख, माजी नगरसेवक प्रा.रणवीरसिंह देशमुख, संग्रामभूमीचे संपादक समीरसिंह देशमुख, अमर सिंह देशमुख, अर्जुन देशमुख, कृष्णा देशमुख, निशांत चिने,सोनू चाऊस आदींची उपस्थिती होती.