ताज्या घडामोडी

अंगारकी चतुर्थी निमित्त राजूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भक्तीचा महापूर.!

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दी

भोकरदन:  भोकरदन,जालना,जाफ्राबाद सिल्लोड सर्वच रस्त्यावर हजारों भाविक पायी दर्शनासाठी निघाले आहे.पायी जाणाऱ्या भाविकांसाठी जागोजागी चहा, पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, जळगाव आदी जिल्ह्यातून भाविक पायी येत आहे. त्यामुळे राजूरकडे रस्त्यावर जणूकाही भक्तीचा महापूर आल्याचे चित्र आहे. 

उद्या मंगळवारी (ता.१२) अंगारकी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर राजूर येथील महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. राजूर महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भोकरदन, जालना, जाफराबाद, सिल्लोडसह मराठवाडा व विदर्भातील विविध भागांतून हजारो भाविक पायी यात्रेला निघाले आहेत.

गावागावातून निघालेल्या भाविकांच्या रांगा रस्त्यावरून सतत पुढे सरकत असून, भोकरदन–राजूर, जालना–राजूर, सिल्लोड–राजूर तसेच जाफराबाद–राजूर मार्गांवर श्रद्धेची लाट उसळलेली दिसत आहे. पायी जाणाऱ्या यात्रेकरूंकरिता मार्गात विविध सामाजिक, धार्मिक संस्था, स्थानिक ग्रामस्थ व सेवाभावी मंडळांकडून चहा, पाणी, फराळ, नाश्ता यांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी विश्रांतीसाठी तंबू उभारले असून, भाविकांना आसनव्यवस्था व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, जळगाव आदी जिल्ह्यांतील अनेक भाविकही राजूरकडे पायी निघालेले दिसत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’ “राजुरेश्वर भगवान की जय”च्या घोषात निघालेल्या पायी दिंड्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. अनेक भाविकांनी अंगारकी चतुर्थीच्या उपवासाचे पालन करतच पायी यात्रा सुरू केली असून, या यात्रेत महिलांचा व लहानग्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.

दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. राजूर परिसरात सुरक्षा कडेकोट तैनात असून, सीसीटीव्ही व स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरीही भक्तांच्या श्रद्धा-भावनेत किंचितही कमी दिसून आलेली नाही.

राजूर महागणपतीच्या दरबारात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’चे जयघोष घुमत असताना, भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान व भक्तिभाव झळकत आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.