कुंडेश्वरच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात ७ महिला भाविकांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

पुणे : पुण्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर शिव मंदिर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. नागमोडी वळणावर घाट चढताना पिकअप जीप रिव्हर्स येत दरीत कोसळली. या दुर्घटनेत ७ महिला जागीच मृत्युमुखी पडल्या असून ३० ते ३५ जणी जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पापळवाडी येथील महिला भाविकांचा पिकअपमधून कुंडेश्वर दर्शनासाठी प्रवास सुरू होता. घाटातील तीव्र चढ आणि नागमोडी वळणावर गाडीचा ताबा सुटल्याने ती ५-६ पलट्या घेत दरीत कोसळली. घटनास्थळी एकच हाहाकार माजला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलवले.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, खेड पोलीस तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.