‘हर घर तिरंगा’ अभियानात भोकरदनच्या न्यू हायस्कूलचा उत्साही सहभाग

भोकरदन : ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरातील न्यू हायस्कूल शाळेच्यावतीने आज (ता.१४) गुरुवार रोजी सकाळी भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीचा उत्साह आणि संस्कार यांचा संगम असलेल्या या प्रभात फेरीत हजारों विद्यार्थी, शिक्षक, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली. पुढे लेझीम पथकाच्या तालावर, देशभक्तीच्या गगनभेदी घोषणांनी शहराचे वातावरण भारावून टाकले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा थोर महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मार्गक्रमण महात्मा फुले चौक, रोकडा हनुमान मंदिर, पोस्ट ऑफिस परिसर, लालगढी, पेशवेनगर, डॉ. हेडगेवार चौक, पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होत पुन्हा शाळेत परत आले. मार्गभर नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
या वेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “जय जवान – जय किसान” अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. प्रभात फेरीचे नेतृत्व मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालकांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य बी.बी.नन्नवरे, व्ही.एम.माळी, आय. टी.भोकन, एस.बी.सुसर, टी.बी.पाटील, पी.एम.लहाने, बी. डी.भानुसे, के जी.दळवी, एस.ए.सोनूने, ए.डी.दहिजे, यांच्यासह इतर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.