ज्येष्ठ नेते व शिक्षणतज्ज्ञ लक्ष्मणराव पाटील गिऱ्हे यांचे निधन
भोकरदन; आज मूळगावी दगडवाडी येथे होणार अंत्यसंस्कार

भोकरदन:
भोकरदन येथील रामेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि शैक्षणिक-सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील गिऱ्हे यांचे सोमवारी (ता.१८) सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने तालुका शोकसागरात बुडाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. नंदकुमार पाटील गिऱ्हे यांचे ते वडील होत.
गिऱ्हे यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल ग्रामपातळीपासून सुरू होऊन संघटनात्मक नेतृत्वापर्यंत पोहोचली. त्यांनी दगडवाडी गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, भू-विकास बँक संचालक, जिनिंग-प्रेसिंग चेअरमन आणि पंचायत समिती सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि शेती-उद्योग या क्षेत्रांत त्यांनी प्रत्यक्ष काम करत जनतेचा विश्वास संपादन केला.
राजकारणातील त्यांची घडण लहानपणापासूनच माजी आमदार कै. रंगनाथराव पाटील यांच्या मुशीत झाली. पुढे त्यांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी खासदार स्व. पुंडलिकहरी दानवे, माजी आमदार स्व. रंगनाथ पाटील जंजाळ, माजी आमदार स्व.संतोष दसपुते आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह खांद्याला खांदा लावून समाजकारण-राजकारणात सक्रिय भूमिका बजावली.अलीकडच्या काळात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ते परिचित झाले होते. याशिवाय विद्यमान आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासोबतही त्यांनी राजकारणाबरोबर समाजकारणात हिरहिरीने सहभाग नोंदवला.
शिक्षण क्षेत्रात गिऱ्हे यांनी संस्थात्मक उभारण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करण्यावर भर दिला. सरळ, प्रामाणिक आणि कार्यकर्त्यांना आधार देणारे व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने स्वाभिमानी, प्रगल्भ व विचारशील नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर आज मंगळवारी (ता.१९) सकाळी दहा वाजता मूळगाव दगडवाडी (ता. भोकरदन) येथे अंत्यसंस्कार होणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गिऱ्हे यांच्या स्मृतींना भावपुर्ण श्रद्धांजली!