भोकरदनला बैलपोळा सणासाठी बाजारपेठ सजली

भोकरदन :
बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरातील बाजारपेठ सजली आहे. पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या दुकानांनी चौकाचौकात रंगत आणली असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण शुक्रवार (ता.२२) रोजी साजरा होणार आहे. सुरुवातीला पावसाने वक्रदृष्टी केल्याने खरिप पिके धोक्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना जिवनदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यायालय परिसर आदी ठिकाणी झुली, नाथा, गोंडे, गेजा, घुंगरू, कवडीमाळा, दोरी, रंगीबेरंगी झुल, घुंगरांचा पट्टा, पितळी घंटा, लाल-हिरवे गोंडे, काळ्या धाग्यातील दिटमणी आदी साहित्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“बैल हा आमचा खरा सोबती आहे. शेतीचे काम त्याच्यामुळे शक्य होते. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. त्यामुळे आम्ही या सणाची आतुरतेने वाट पाहतो,” “यंदा सुरुवातीला पावसाने धास्ती दाखवली होती. पण आत्ता पिके बहरली आहेत. त्यामुळे पोळ्याचा आनंदही दुप्पट झाला आहे.” – गजानन सिरसाठ, शेतकरी वाकडी
“दरवर्षी पोळ्याच्या आठवड्यात झुल, गोंडे, कवडीमाळा, घंटा यांची मोठी विक्री होते. या आठवड्यात अपेक्षीत पाऊस झाल्याने यंदा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी चांगली असेल अशी अपेक्षा आहे. – अमोल वडगावकर, व्यापारी भोकरदन