भोकरदनमध्ये राजकीय ‘समन्वया’ची चविष्ट भेट!
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी घेतली आमदार संतोष दानवे यांची सदिच्छा भेट

भोकरदन :
छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस–अजित पवार गट) यांनी आज गुरुवारी (ता.२१) भोकरदन येथे आले असता भाजपा आमदार संतोष दानवे यांच्या निवासस्थानी भेट देत सदिच्छा संवाद साधला. सुमारे तास भर रंगलेल्या या भेटीत विकासनियोजन, निधी वितरण, तसेच पंचायत राज प्रणालीतील प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार संतोष दानवे व समितीचे सदस्य असलेले आमदार विक्रम काळे—या दोघांचा एकाच टेबलवर ‘समन्वय’चा सूर जुळल्याने स्थानिक राजकारणातही कुजबुज सुरू झाली आहे. पक्षभेद बाजूला ठेवून मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षणक्षेत्रातील राहिलेली कामे, तसेच ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, शाळांच्या दुरुस्ती व डिजिटल साधन सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर पुढील काळात संयुक्त स्तरावर पाठपुरावा करण्याचे संकेत या बैठकीतून उमटले. शिवाय पंचायत राज समितीतून समन्वित निधी नियोजन, शिक्षक मतदारसंघातील शाळांसाठी सुविधा-वाढ व दुरुस्ती प्रस्तावांना गती, शैक्षणिक गुणवत्तेसाठी डिजिटल वर्ग, ग्रंथालय सुधारणा यांवर भर आदि विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
दरम्यान या सदिच्छा भेटीमुळे विरोधी खेम्यांतील आमदार एकाच छताखाली विकासाचा रोडमॅप आखताना दिसत असल्याने स्थानिक राजकारणाला नवा ट्विस्ट मिळाल्याची चर्चा सुरू आहे.