महाराष्ट्र

बैल धुण्याच्या आनंदात दु:खाची सावली; 14 वर्षीय सुरज कदमचा खदानीत बुडून मृत्यू

जालना : (परतूर तालुका) :
बैलपोळ्याच्या आधीच जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या खांडवीवाडी शिवारात काळाने कहर केला. बैल धुण्यासाठी गेलेल्या सुरज कदम (वय 14) या चिमुकल्या तरुणाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पोळ्याचा उत्साह क्षणात मावळला आहे.

सूरजने बैल धुण्यासाठी शाळेत सुट्टी मागितली होती, पण शिक्षकांनी परवानगी दिली नव्हती. तरीही मधल्या सुट्टीत तो घराकडे धावला. आपल्या चुलत्यासोबत खदानीवर बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेला. गावातील लोक बैल धुण्यात रमले असतानाच अचानक सूरजचा पाय घसरला… क्षणभरात तो खोल पाण्यात गेला आणि परत वर आला नाही.

गावकऱ्यांनी धावपळ केली, पण काळाने निर्दयी खेळ केला होता. बैलपोळ्याच्या सणाआधीच सूरजच्या जाण्याने गाव शोकमग्न झाले. आई-वडिलांच्या डोळ्यांतील आसवे आणि शेजाऱ्यांच्या हुंदक्यांनी गावातील वातावरण अधिकच शोकाकुल केले आहे.

“सूरजसारखा हसतमुख मुलगा गेला यावर विश्वासच बसत नाही” अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांची आहे. आनंदाचा सणच आता गावासाठी कायमस्वरूपी हळहळ बनून राहिला आहे.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा..
सुरज हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अचानक पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.