माहोरा येथील माजी सरपंच व नामांकित डॉक्टर रवींद्र कासोद यांचे अपघाती निधन

माहोरा :
माहोरा (ता. जाफ्राबाद) गावचे माजी सरपंच तसेच श्री हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर रवींद्र कासोद यांचे शुक्रवारी (ता.२२) रात्री झालेल्या अपघातात निधन झाले. या घटनेने माहोरा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर रविंद्र कासोद हे शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी माहोरा-धाड रस्त्याने गेले होते. परत येत असताना हॉटेल संस्कृती जवळ एका भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
डॉ. कासोद यांचा मनमिळावू व रुग्णाभिमुख स्वभाव लक्षात घेता ते परिसरात अत्यंत लोकप्रिय होते. प्रत्येक रुग्णाला वेळ देणे, मदतीस तत्पर असणे ही त्यांची जिव्हाळ्याची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने गावासह परिसरातील रुग्ण व नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली कासोद यांचे ते वडील होते. शनिवारी (ता.२३) दुपारी त्यांच्यावर माहोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.