“शत्रू की सखा? काजू प्लेटीतून राजकारणाची नवी गोडी!”
पालकमंत्री संजय सिरसाट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संदिपान भुमरे तीन कट्टर राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर

छत्रपती संभाजीनगर :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन झाले. मात्र या उद्घाटनापेक्षा लोकांचे लक्ष वेधून घेतले ते व्यासपीठावरच्या सोफ्यावर बसलेल्या तीन कट्टर राजकीय विरोधक नेत्यांनी.
होय, कारण एरवी एकमेकांचे वस्त्रहरण करणारे खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ हे तिघे एका सोप्यावर शेजारी-शेजारी बसलेले. त्यातही गंमत अशी की एका प्लेटमधून काजू खाणे, कानामध्ये कुजबुज करणे आणि हसत-हसत एकमेकांना दाद देणे… म्हणजे ‘शत्रुत्व विसरून काजू-मैत्री’ असंच काहीसं दृश्य होतं!
राजकारणात रोज टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप, अधिवेशनात ओरडा-ओरड… आणि इथे मात्र काजू खात गोडीगुलाबी मैत्रीचे दर्शन. त्यामुळे जनतेत प्रश्न उभा राहिलाच आहे की “हे खरंच राजकीय विरोधक आहेत की पडद्यामागे ‘मिलीभगत’? राजकारण एक नंबरचं पण मैत्री ‘टू नंबरची’?”
गंमत म्हणजे, नुकत्याच पावसाळी अधिवेशनात दानवे यांनी शिरसाठांवर हॉटेल खरेदी, भूखंड व्यवहार, राजीनाम्याची मागणी यासारखे गंभीर मुद्दे उचलले होते. तर भुमरे यांच्यावर दारूच्या दुकानावरून जोरदार टीका केली होती. पण व्यासपीठावर मात्र काजूची चव राजकारणाच्या कटुतेला विसरायला लावणारी ठरली!
एकंदरीत, सभागृहात “कडू शत्रू” तर व्यासपीठावर “गोड मित्र” असं समीकरण पाहून जनतेत आता संभ्रम निर्माण होत आहे.