श्रावण संपताच मांसाहारींची मटण दुकानांवर ‘झिंगाट’ गर्दी.!

भोकरदन:
शनिवारी (ता.२३) पोळ्याच्या ढोल-ताशांच्या गजरात श्रावणाचा शेवट झाला आणि रविवारी सकाळीच मांसाहारी मंडळींच्या पोटातील ढोल वाजू लागले. शनी अमावास्येनंतर सोमवारी मांसाहार टाळायचा, मंगळवारी हरतालिका, त्यानंतर दहा दिवस बाप्पा घरात… म्हणजे मांसाहाराला पुन्हा दिर्घ सुट्टी! त्यामुळे रविवारी एकच दिवस “खाऊन घ्या, पुढचं पाहूया” असा ठरला.
त्याचा परिणाम म्हणजे शहरातील मटण-चिकन आणि मासळी बाजारात अक्षरशः जनसागर उसळला. कुणी पाव किलो मटणासाठी अर्धा तास रांगेत उभे, तर कुणी ताज्या मासळीसाठी भावाकडे डोळा मारत घासाघीस करताना दिसले.
श्रावणभर उपवास, फराळ, भगर, साबुदाणा खाल्ल्यानंतर रविवारी मांसाहारी मंडळींनी असा ताव मारला की जणू “शाकाहार संपला, आता मांसाहाराची बाराखडी सुरू” झाली.
रविवारी शहरातील मटण–चिकन दुकाने अक्षरशः ग्राहकांनी गच्च भरली.एखाद्या राजकीय सभेत जशी गर्दी उसळते, तशीच गर्दी “बकर्याच्या मटणाच्या” पुढ्यात दिसली. तर मासळी बाजारात ग्राहकांची चढाओढीचे चित्र दिसून आले.
याशिवाय शहरातील हॉटेल आणि ढाबे देखील गर्दीने फुल्ल झाल्याचे दिसून आले. एकंदरीत हा रविवार मांसाहार प्रेमींसाठी एक सुवर्ण दीन ठरला असे म्हटले तर वावगे ठरू नये.