“भोकरदन हे शांतता प्रिय शहर” – आमदार संतोष दानवे यांचा विश्वास
भोकरदन पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

भोकरदन :
आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, दसरा, दिवाळी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, मान्यवर व नागरिक या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार संतोष दानवे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, “भोकरदन शहर हे शांतता प्रिय शहर म्हणून ओळखले जाते. आजवर येथे सर्व समाज बांधवांनी परस्परांमध्ये एकोपा ठेवून सर्व सण साजरे केले आहेत. या परंपरेला पुढेही कायम ठेवले जाईल, अशी मला खात्री आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून नागरिकांना सणांचा आनंद निर्विघ्नपणे घेता येईल.”
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी सर्व गणेश मंडळांनी मंडळाची रितसर नोंदणी करूनच उत्सव साजरा करावा, असे स्पष्ट केले. तसेच ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळणे, रात्री ठरावीक वेळेनंतर वाद्य न वाजवणे आणि मूर्तिस्थापना व विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाला वेळेत कळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी डॉ. बी. सरवनन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, उत्तेजक संदेश किंवा खोटी माहिती पसरवू नये. तरुण वर्गाने उत्साहात मात्र जबाबदारीने सण साजरा करावा. सण हा आनंदाचा आणि ऐक्याचा प्रतीक आहे, तोच संदेश प्रत्येकापर्यंत जावा.”
यावेळी पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी वाहतुकीचे नियोजन, मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग, सुरक्षा व्यवस्था, तसेच गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद व दसरा दिवाळी सणाच्या काळात पोलिस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली.
बैठकीत विविध समाजबांधवांनीही आपापले मत मांडले. शहरात शांतता, भाईचारा व धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीला शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.