महाराष्ट्र

उपचाराऐवजी मृत्यूचा प्रवास…!

राजुर–टेंभुर्णी मार्गावर पाच जणांचा करुण अंत

भोकरदन :
अर्धांगवायूच्या रुग्णाला उपचारासाठी सुलतानपूर येथे घेऊन जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घालून भीषण अपघात घडवला. राजुर–टेंभुर्णी मार्गावर पहाटे झालेल्या या भीषण अपघातात कोपर्डा (ता. भोकरदन) येथील तिघांचा तर गेवराई गुंगी येथील दोघांचा मृत्यू झाला. एकाच वेळी पाच जणांचा करुण अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत पद्माबाई लक्ष्मण भांबिरे,  ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे,  अजिनाथ तुळशीराम भांबिरे (कोपर्डा) तसेच ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले व  निर्मलाबाई सोपान डकले (गेवराई गुंगी) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास अपघात घडला. उपचारासाठी जात असलेली ही चारचाकी गाडी अचानक समोर आलेल्या मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन व्यक्तींना चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. गाडी दोन ते तीन पलट्या खात थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत जाऊन पडली.

नेमकं काय घडलं?

पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास टेंभुर्णीजवळ वेगाने येणाऱ्या कारने रस्त्यावर चालणाऱ्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिली. या धडकेत भगवान साळुबा बनकर (५५) गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. धडक झाल्यानंतर वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दोन-तीन पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील विहिरीत कोसळली.

मदतीला धावले पोलिस आणि नागरिक..
घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस धावले. परंतु विहिरीत पाणी भरलेले असल्याने बचावकार्य अवघड झाले. जीव वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण नशिबाचा खेळ वेगळाच होता. शेवटी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढले गेले आणि आत मृत्यूला कवटाळलेल्या पाचही जणांना बाहेर काढण्यात आले.

गावावर दुःखाचे सावट...
या अपघाताची बातमी समजताच कोपर्डा व गेवराई गुंगी गावात आज हळहळ व्यक्त होत आहे. एकाच वेळी इतक्या जणांचा मृत्यू झाल्याने गावच सुन्न झाले आहे. रडण्याचा आवाज प्रत्येक घरातून येत आहे. नातेवाईकांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.