३८८ गणेश मंडळांचा उत्साह शिगेला ; १०५ गावांनी रचला ऐक्याचा आदर्श
भोकरदन उपविभागात गणेशोत्सवाची धामधूम

भोकरदन:
गणेशोत्सवाच्या आगमनाने संपूर्ण शहर आणि ग्रामीण भाग उत्साहात न्हाऊन निघाला आहे. भोकरदन उपविभागातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत यंदा तब्बल ३८८ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर १०५ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ या आदर्श संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस ठाण्यानुसार गणेश मंडळांचा तपशील असा – भोकरदन पोलिस ठाण्यांतर्गत ९५, पारध ४१, हसनाबाद ७६, जाफराबाद १०५ आणि टेंभुर्णी पोलिस ठाण्यांतर्गत ७२ गणेश मंडळे नोंदविण्यात आली आहेत.
दरम्यान, गावपातळीवर ऐक्य व बंधुतेचा संदेश देणाऱ्या ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, भोकरदन तालुक्यातील २४, हसनाबाद २३, पारध ११, जाफराबाद २५ व टेंभुर्णी २२ गावांमध्ये या संकल्पनेतून उत्सव साजरा होत आहे.
“एक गाव एक गणपती”या उपक्रमामुळे उत्सव अधिक शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक व सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा ठरेल, गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि श्रद्धेचा पर्व असला तरी तो शिस्तबद्ध व शांततेत पार पडणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी “संग्रामभूमी”शी बोलताना म्हणाले.