मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर मागे ; आझाद मैदानावर जल्लोष

मुंबई संग्रामभूमी वृत्तसेवा: – मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरु असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर पाचव्या दिवशी संपुष्टात आलं आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे यांनी जूस घेऊन उपोषण मागे घेतलं.
उपोषण सोडण्यापूर्वी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. शिष्टमंडळाने घेतलेले निर्णय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
उपोषण सोडताना आझाद मैदान जल्लोषात न्हाऊन निघालं. गुलालाची उधळण, घोषणाबाजी आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या वेळी मनोज जरांगे पाटील भावूक झाले असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले. तर उपस्थित आंदोलकांनी ‘मनोज जरांगे पाटील’ यांच्या नावाचा गजर करून वातावरण भारावून टाकलं.