भोकरदनला गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन कटेकर यांची माहिती

भोकरदन:
भोकरदन शहरात मागील दहा दिवसांपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी तयारी केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी “संग्रामभूमी”शी बोलतांना दिली.
यावेळ डॉ नितीन कटेकर म्हणाले की, गणेश विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच मिरवणुकीत आणि भोकरदन उपविभागातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल तसेच दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भोकरदन पोलीस निरीक्षक, किरण बिडवे यांनी आवाहन केले की, “गणेश विसर्जन हा आनंदाचा व भक्तिभावाचा सोहळा आहे. मात्र, हा उत्सव शांततेत आणि ठरवून दिलेल्या वेळेत पार पाडणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गणेश मंडळांनी शिस्तीचे पालन करावे आणि कोणताही अतिरेक टाळावा. सामाजिक सलोखा अबाधित ठेवणे हेच बाप्पाला दिलेले खरे निरोपगीत ठरेल.” असे यावेळी ते म्हणाले.