भोकरदन पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे भक्तिभावाने विसर्जन
विसर्जन मिरवणूकीत पोलिस अधिकारी-कर्मचारी थिरकले

भोकरदन
भोकरदन शहरात पोलीस ठाण्यात विराजमान करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे शुक्रवारी भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढून विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी विविध गाण्यांच्या तालावर थिरकत सहभागी झाले. त्यामळे पोलीस बांधवांचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
मिरवणुकीची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी भोकरदन पोलीस ठाण्यातून करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून वाजतगाजत आणि ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. पोलीस कर्मचारी गणपती बाप्पाच्या गजरात नाचत होते. या मिरवणुकीत शहरातील नागरीक, व्यापारी, विवीध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर महिला पोलिस कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. भोकरदनकर थबकून हा अनोखा देखावा पाहत होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यात गणपती बसविण्यात आला होता. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या ठाण्यात गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली असून, ती हळूहळू एक वेगळी ओळख बनली आहे. “कर्तव्याच्या कडक शिस्तीत राहणारे पोलीस अधिकारीही समाजाच्या आनंदसोहळ्यात सहभागी होतात” हे चित्र लोकांसमोर आले आहे.
विशेष म्हणजे, शनिवारी सर्वत्र गणेश विसर्जनाची मिरवणूक होणार असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असणार आहे त्यामुळे गर्दीच्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन एक दिवस आधीच केले. या मिरवणुकीत पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, उपनिरीक्षक भास्कर जाधव यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नृत्य करीत सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे पोलीस दलातील ताणतणाव काहीसा हलका होत असल्याचं बोललं जातंय. नागरिकांमध्येही पोलिसांच्या या आनंदी रूपामुळे आपुलकीची भावना निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.