खेड तालुक्यातील अकाली विझलेला तेजोमय तारा…!
अश्विनी केदारीचे निधन; संघर्षातून घडलेली तेजस्वी मुलगी हरपली

पुणे संग्रामभूमी वृत्तसेवा:
“शेतकऱ्याच्या घरातून जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचायचं आहे,” हे स्वप्न डोळ्यांत भरून जगणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०, पाळू, तालुका खेड) आता कायमची दूर निघून गेली आहे. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवून राज्यभरात कौतुकाचा वर्षाव झालेली ही कन्या गेल्या महिन्यातील अपघातानंतर मृत्यूशी झुंज देत होती. मात्र सर्व प्रयत्नांना अपयश आले आणि अखेर तिच्या आयुष्याचा प्रवास थांबला.
घडलेली संपूर्ण घटना अशी दिनांक २८ ऑगस्टच्या पहाटे अभ्यास संपवून अश्विनीने अंघोळीचे पाणी तापवायला ठेवले. पाणी जास्त तापल्याचे पाहण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि दुर्दैवाने हिटरचा धक्का बसला. उकळते पाणी अंगावर सांडल्याने ती गंभीर भाजली. तब्बल ८० टक्क्यांहून अधिक भाजल्याने तिची स्थिती नाजूक होती. दवाखान्यात अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
अश्विनीच्या उपचारासाठी समाजाने पुढाकार घेतला. कुणी आर्थिक मदत केली, कुणी रक्तदान केले. शेकडो हात तिच्या पाठीशी उभे राहिले. पण सारे हात रिकामे परतले. गावकुसातून जिल्हाधिकाऱ्याचे स्वप्न रंगवणाऱ्या मुलीची कहाणी येथेच थांबली.
तिच्या जाण्याने संपूर्ण खेड तालुका, तिच्या सहाध्यायी मित्रमंडळी, आणि स्पर्धा परीक्षेच्या हजारो विद्यार्थ्यांत शोककळा पसरली आहे. “एक मुलगी किती मोठं स्वप्न पाहू शकते, किती जिद्दीने त्यासाठी लढू शकते,” हे दाखवून देणारी अश्विनी आज नाही, पण तिच्या स्मृती तिच्यासारखे होण्याची जिद्द असणाऱ्यांना कायम प्रेरणा देत राहतील.
“ते फक्त तिचे स्वप्न नव्हते तर”…
अश्विनीला जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न होते. ते फक्त तिचे स्वप्न नव्हते, तर ग्रामीण भागातील हजारो मुलींच्या आकांक्षांचे प्रतिबिंब होते. दुर्दैवाने ते स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, तिच्या कर्तृत्वाने दाखवून दिले की साधनसंपत्ती नसली तरी इच्छाशक्ती असेल तर यश दूर नाही.
मनाला चटका लावणारा प्रश्न..!
यातून एक प्रश्न मात्र चटका लावणारा आहे—अशा कर्तृत्ववान मुलांसाठी शासनाने तातडीने वैद्यकीय मदतीच्या योजना, विशेष निधी, त्वरित उपचार केंद्रे उपलब्ध करून द्यायला नकोत का? कारण अशा प्रतिभा गमावणे म्हणजे समाजाचा आणि राष्ट्राचा भविष्यकाळ गमावणे होय.अश्विनी आता नाही, पण तिची जिद्द, परिश्रम आणि स्वप्ने प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थ्याला प्रेरणा देत राहतील. तिच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली म्हणजे अशा प्रतिभावान तरुणाईच्या पाठीशी समाज आणि शासन उभे राहणे होय.