वोट चोरी अभियाना संदर्भात युवक काँग्रेसच्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती लावा – राहुल देशमुख
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी नवज्योत सिंग संधू यांची राहणार प्रमुख उपस्थितीत

जालना :
देशातील लोकशाही प्रक्रियेत गंभीर घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकताच केला. निवडणुकीत झालेल्या या कथित गैरप्रकारांवर आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने “वोट चोर गद्दी छोड” हा देशव्यापी अभियानात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जालना येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रभारी नवज्योत सिंग संधू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रदेश सरचिटणीस गणेश उबाळे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
बैठकीत या आंदोलनाचा पुढील आराखडा, संघटनात्मक पातळीवर उचलायच्या भूमिका आणि जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यक्रमांची आखणी यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, युवक कार्यकर्ते व समर्थकांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केले आहे.
युवक काँग्रेसच्या या बैठकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात असून, या आंदोलनातून पुढील काही दिवसांत आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.