जालना जिल्ह्याला यलो अलर्ट; विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार दि. 14 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे (30 ते 40 किमी प्रतितास वेगाने) तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नागरिकांना दक्षतेचे आवाहन
या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील अचानक बदल लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना
-
विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांच्या आडोशाला, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या जागेत थांबू नये.
-
शेतकरी बांधवांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
-
शेतातील वीजपंप, मोटार, यंत्रसामग्री वापरताना विशेष काळजी घ्यावी.
-
जोरदार वाऱ्याच्या वेळी घरातील खिडक्या-दारे घट्ट बंद ठेवावीत.
-
शहरी भागात नागरिकांनी रस्त्यावर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या, विद्युत तारा यांपासून सावध राहावे.