“महसूल विभागाला काळिमा; अपंगाच्या अर्जासाठी भोकरदन तालुक्यातील तलाठ्याची दारूबाज अट!”
मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल; विकलांग महिलेच्या अर्जावर सही करण्यास टाळाटाळ

जालना :
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील महसूल विभागातील एका तलाठ्याची निर्लज्ज दादागिरी समोर आली आहे. अपंग महिलेनं इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेसाठी केलेल्या अर्जावर सही करण्यासाठी तलाठ्याने चक्क बियर बारचे बिल भरण्याची अट घातली. इतक्यावरच थांबता न राहता, मद्यधुंद अवस्थेत अर्जदार महिलेलाच बारमध्ये बोलावून आणण्याचा हट्ट धरला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, संतापाची लाट उसळली आहे.
काय घडलं?
जैनपूर कोठारा येथील एका अपंग महिलेनं राष्ट्रीय विकलांग पेन्शन योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज प्रक्रियेत तलाठ्याची सही व शिक्का आवश्यक असल्याने तिच्या नातेवाईकांनी वारंवार संपर्क साधला. मात्र, तलाठी सतत टाळाटाळ करत राहिला.
शेवटी फोनवरून बोलावलं असता, तलाठी महाशय बियर बारमध्येच बसलेले होते. तिथूनच त्यांनी थेट बिल भरण्याची मागणी केली. सुरुवातीला अर्जावर सही केली, पण नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यानंतर तलाठ्याने चक्क सही खोडून टाकली. यानंतर अपंग महिलेलाच बारमध्ये आणण्याचा दारुड्या अधिकाऱ्याने हट्ट धरला.
“असा अर्ज कसा मंजूर होतो ते दाखवतो” अशा धमकीच्या शब्दांत तलाठ्याने अपमानास्पद वर्तन केले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
प्रशासनावर काळं ढग
एका अपंग महिलेच्या हक्काच्या योजनेसाठी जबाबदार असलेला अधिकारी दारूच्या नशेत असा अट्टाहास मांडतो, हे लोकशाहीस आणि प्रशासनाच्या विश्वसनीयतेस काळिमा फासणारं आहे. महसूल विभागातील जबाबदार पदावरील व्यक्तीने फाईलवर सहीऐवजी दारूचं बिल मागणं हा प्रकार संतापजनक असून, प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे.
कारवाईची मागणी
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित तलाठ्याविरोधात तात्काळ निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून, आता महसूल प्रशासन आणि पोलिसांची भूमिका नेमकी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.