महसूल विभागाला काळिमा फासणाऱ्या “त्या” दारुबाज तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे”
तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी पाठवला जिल्हाधिकाऱ्यांकडे निलंबनाचा प्रस्ताव; प्रकरणानंतर प्रशासन हलकल्लोळात

जालना :
अपंग महिलेच्या अर्जावर सही करण्यासाठी बियर बारचे बिल मागणाऱ्या भोकरदन तालुक्यातील नांजा येथील तलाठ्याच्या कारनाम्याने राज्यभर संताप उसळला आहे. या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर प्रशासनालाही धाव घ्यावी लागली आहे. तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी संबंधित तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे.
घडला नेमका प्रकार
जैनपूर कोठारा येथील अपंग महिलेनं इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जावरील सही व शिक्क्यासाठी तलाठ्याशी नातेवाईकांनी संपर्क साधला. मात्र तलाठ्याने अर्जावर सही करण्याऐवजी चक्क बियर बारचे बिल भरण्याची अट घातली. त्याहूनही धक्कादायक म्हणजे, सुरुवातीला सही करून नंतर बिल न भरल्यामुळे सही खोडून टाकली आणि अर्जदार महिलेलाच बारमध्ये बोलावण्याचा अट्टाहास धरला.
या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. गावकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांतून प्रशासनावर टीका होऊ लागली.
प्रशासनाची धावपळ
प्रकरण गंभीर स्वरूप धारण करताच तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांनी तात्काळ अहवाल सादर करून संबंधित तलाठ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केला आहे. आता जिल्हाधिकारी स्तरावरून औपचारिक आदेश होण्याची प्रतीक्षा आहे.
नागरिकांतून संतापाची लाट
एका अपंग महिलेच्या हक्काच्या योजनेत दारूच्या नशेत दादागिरी करणाऱ्या तलाठ्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्याच्या अशा वर्तनामुळे प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुढील कारवाईकडे लक्ष
सध्या तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असून, या प्रकरणात केवळ निलंबन पुरेसं नाही, तर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.