कांद्याला भाव नाही; शरद पवारांचा हल्लाबोल – “शिवाजी महाराजांचं नाव घेता, पण बळीराजाकडे पाहत नाही”

राज्यातील शेतकरी सध्या कांद्याला भाव नसल्यामुळे संकटात सापडला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाशिक येथे आयोजित आक्रोश मोर्चाला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून प्रहार केला.
“देवाभाऊ, शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना देऊन त्यांनी शेती उभी केली. पण आज शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाहीत आणि सरकार बघ्याची भूमिका घेतं. हे आम्हाला मान्य नाही,” अशा शब्दांत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
शेतकरी संकटात – सरकार बघ्याची भूमिका
पवार म्हणाले, “बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान झालं. मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्राची आहे. पण आज शेतकरी आक्रोश करतोय आणि सरकार डोळेझाक करतेय.”
ते पुढे म्हणाले, “ग्रामीण भागात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाडा तर आत्महत्यांचा केंद्रबिंदू झाला आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत अडकला म्हणून जीव देतो. तरीसुद्धा सरकारकडून सहानुभूती मिळत नाही.”
“१० दिवसांत ७० हजार कोटींचं कर्जमाफ”
आपल्या कृषीमंत्रीपदाच्या काळातील अनुभव सांगताना पवार म्हणाले, “यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मी दुसऱ्याच दिवशी तेथे गेलो. त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू पाहून आम्ही १० दिवसांत ७० हजार कोटींचं कर्ज देशभरात माफ केलं. कारण शेतकरी वाचला पाहिजे, हे आमचं कर्तव्य होतं.”
कांद्याच्या निर्यातबंदीवर सरकारवर ताशेरे
कांद्याच्या भावपतनाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले,
“नाशिकचा कांदा जगभर जातो, त्यातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण करता येतं. पण केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि बळीराजाला अडचणीत टाकलं. या सरकारला शेतकऱ्यांचं दु:ख समजतच नाही.”