भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला पहिला पूर; पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सिल्लोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भोकरदन शहरावर झाला असून, शहरातून वाहणाऱ्या केळना नदीला यंदाचा पहिला पूर आला आहे. सोमवारी दुपारपासूनच नदीच्या प्रवाहात वाढ होत गेली. सायंकाळपर्यंत नदीचे पाणी वेगाने वाढल्याने नदीने दैदिप्यमान रूप धारण केले.
पूर पाहण्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता उसळली. आलापुर पूल, जाफराबाद रस्त्यावरील पूल, तसेच नदीकाठच्या भागांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी कुटुंबासह नदीचे निसर्गरम्य दृश्य अनुभवले. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यातून सेल्फी व व्हिडिओ घेत हा क्षण टिपून ठेवला.
दरम्यान, नदीला आलेल्या या पहिल्या पुरामुळे भोकरदन शहर व परिसरातील विहिरी, बंधारे व शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याच्या गरजेला दिलासा मिळणार आहे. रब्बी पिकांसाठीही ही पावसाची बरसात व नदीतील वाढलेला प्रवाह फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज आहे.
पहिल्या पुरामुळे केळना नदीने जरी देखणे रूप धारण केले असले, तरी नागरिकांनी काळजीपूर्वक आनंद घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.