सांगली जिल्ह्यात “स्पेशल 26” स्टाईल दरोडा!
कवठेमहांकाळमध्ये बनावट आयकर अधिकाऱ्यांनी केली डॉक्टरांच्या घरी कोट्यवधींची लूट

सांगली संग्रामभूमी वृत्तसेवा:
“अक्षय कुमारचा स्पेशल 26” हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. 1987 साली बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी घडवलेल्या धाडसी लुटीवर आधारित हा सिनेमा होता. त्या सिनेमात बनावट अधिकारी सरकारी छाप्याच्या नावाखाली करोडोंची लूट करतात.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये घडलेली ही घटना अक्षरशः त्याच पद्धतीने वाटते. तीन पुरुष आणि एक महिला अगदी चित्रपटातील गँगप्रमाणेच! हातात फाईल्स, अधिकाऱ्यांचे ढंग, आत्मविश्वासाने दिलेले आदेश आणि पाहता पाहता मुद्देमाल लंपास. स्पेशल 26 सिनेमात प्रेक्षकांना थरार जाणवला; पण कवठेमहांकाळमध्ये मात्र हा थरार थेट नागरिकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. पडद्यावर पाहताना रोमांचक वाटणारी ही शैली प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भीतीदायक ठरली.
कवठेमहांकाळ शहर हादरवून सोडणारी घटना रविवारी उशिरा घडली. शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी थेट आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार अज्ञातांनी घरफोडी केली. यात तब्बल दोन कोटींच्या आसपासची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. म्हेत्रे यांचे झुरेवाडी रोडवरील गुरुकृपा हॉस्पिटल परिसरातील निवासस्थान हे दरोडेखोरांनी टार्गेट केले. रात्री ११:३० ते १२:३० या वेळेत तीन पुरुष व एक महिला असे चौघेजण घरात घुसले. “आयकर छापा” टाकत असल्याचा बहाणा करून त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. पाहता पाहता घरातील सोन्या-चांदीसह रोकड हिसकावून फरफट केली.
घटनेनंतर डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना कळवले. दरम्यान, कवठेमहांकाळ पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तसेच परिसरातील साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे ही बनावट अधिकारी टोळी कोण, याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या धाडसी दरोड्यामुळे शहरात भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, दरोडेखोरांची टोळी अजूनही फरार आहे.