शाहीर रत्न दादाराव जाधव यांना ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025’

मलकापूर (जि. बुलढाणा) वृत्तसेवा:
समाजकारण, सांस्कृतिक वारसा जपणं आणि शाहिरी परंपरेतून लोकजागृती घडवणं या कार्याला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे मराठवाडा प्रदेश प्रवक्ता, वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य, शाहिर रत्न दादाराव शामराव जाधव यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 ने गौरविण्यात आले.
शिक्षक दिन आणि दै. कर्णधार वर्धापनदिनाच्या औचित्याने मलकापूर येथे दि. 11 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात जाधव यांना सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री ताई काटीकर पाटील (हिंदी-मराठी पत्रकार संघ) व डॉ. ए. डब्ल्यू. खरचे (B.E. Civil, M.E., Ph.D.) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मानाने केवळ जाधव यांचा गौरव झाला नाही, तर संपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक अभिमान अधिक उंचावला आहे.
दादाराव जाधव यांनी शाहिरी परंपरेतून समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेली आहे. वाघ्या मुरळी परिषदेचे प्रवक्ता म्हणून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न मांडले, उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी आवाज उठवला आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. त्यांची ही धडपड लक्षात घेऊनच राष्ट्रीय स्तरावर त्यांना आयकॉन म्हणून गौरवण्यात आले.
दादाराव जाधव हे के-हाळा (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असून, त्यांचा सन्मान झाल्यामुळे गावासह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. कार्यकर्ते, साहित्यिक, सामाजिक संघटना व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.