जालन्यात धनगर समाजाचा एस.टी.आरक्षणासाठी एल्गार : दिपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सुरू

जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षणाचा हक्क मिळावा या मागणीसाठी जालना शहरात आजपासून (बुधवार, दि. १७ सप्टेंबर) आमरण उपोषणाची ठिणगी पेटली आहे. आंदोलक नेते दिपक बोऱ्हाडे यांनी अंबड चौफुलीवर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
दिपक बोऱ्हाडे यांनी आमरण उपोषणाच्या प्रारंभी समाजास उद्देशून ठाम शब्दांत इशारा दिला : “जोपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार नाही. समाजाने विश्वास ठेवावा, तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.” यावेळी त्यांनी सर्व समाज बांधवांना एकदिलाने लढा देण्याचे आवाहन केले. “यापुढे कोणताही राजकीय पक्ष न पाहता समाज हाच आपला पक्ष आहे. प्रत्येकाने समाजासाठी कामाला लागले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने धनगर बांधवांनी उपस्थित राहून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला. महिलांचा व तरुणांचा मोठा सहभाग जाणवला. परिसरात ‘धनगर समाजाला न्याय द्या’, ‘आरक्षण हा आमचा घटनादत्त हक्क’ अशा घोषणा सतत घुमत होत्या.
धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून, विविध स्तरांवर आंदोलनं झाली आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात नाराजी वाढली आहे. दिपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. उपोषणस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
समाजाच्या या लढ्याला राजकीय पक्षांकडून नेमका काय प्रतिसाद मिळतो आणि शासनाची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता राज्यभरातील धनगर समाजाचे डोळे लागले आहेत.