
भोकरदन
आकाशातून बरसलेल्या तुफानी पावसाने तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प क्षमतेपेक्षा भरून आता ओसंडून वाहू लागला आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या भोकरदन शहरासह तीस गावांचा वर्षभराचा पाणीप्रश्न सुटला असून, तहानलेली गावे आता समाधानाचा श्वास घेत आहेत.
पावसाळा संपत आला तरी नदी-नाले कोरडे, जलसाठे उघडे पडले होते. पण गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने निसर्गाने जणू दुष्काळी सावट हद्दपार केले. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाण्याचा नितळ प्रवाह सोडला जात आहे. त्यामुळे आगामी हंगामात पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होणार आहे.
शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत
जुई प्रकल्पातील साठ्यामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. खरीप हंगाम वाचवतानाच रब्बी पिकांनाही याचा लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
—
धबधब्यासारखा नजारा, गर्दीने धरण परिसर फुलला
सांडव्यावरून वाहणारे पाणी एखाद्या नितळशार धबधब्यासारखे भिंतीवरून कोसळत आहे. या मोहक दृश्याचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने धरण परिसरात गर्दी करत आहेत. कॅमेऱ्यात कैद होत असलेले हे निसर्गचित्र जणू जलमंगल सोहळ्याची अनुभूती देत आहे.
—