जिल्हा

“निसर्ग उदार, प्रशासन उदासीन” जुई धरण ओसंडून वाहतंय मात्र नगरपालिकेच्या टाळाटाळीमुळे जनता तहानलेलीच

 

भोकरदन

तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प क्षमतेपेक्षा भरून वाहतो आहे. भोकरदनसह तीस गावांना दिलासा मिळाला असला तरी नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे शहरातील नागरिक आजही थेंबाथेंबाला तहानलेले आहेत. निसर्गाने उघड्या घागरी भरून दिल्या, पण नगरपालिकेने पाण्याच्या नळांना कुलूप लावल्यासारखी अवस्था केली आहे. त्यामुळे “निसर्ग उदार तर प्रशासन उदासीन” अशी चर्चा शहरात सुरू आहे.

भोकरदन शहरातील पाणी टंचाईचे हे चित्र प्रशासनाच्या बेफिकिरीचे आणि जनतेशी केलेल्या विश्वासघाताचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे. भोकरदन शहरातील काही भागात गेल्या दहा दिवसांपासून नळ कोरडे आहेत. पाण्याचा साठा डोळ्यांसमोर असूनही नागरिकांना तहानलेलं ठेवणं हे प्रशासनाचं थेट अपयश नाही तर बेदरकारपणाचं प्रदर्शन आहे. पालिकेचे हे टाळाटाळीचे कारस्थान आणि जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे धोरण नागरिक सहन करणार नाहीत. धरण भरलं, पाणी उपलब्ध आहे, तरीसुद्धा शहर तहानलेलं ठेवणं हा गुन्हाच म्हणावा लागेल.

धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असताना पालिका भोकरदनकरांना नियमीत पाणीपुरवठा करू शकत नसेल तर नगरपालिका नेमकी कशासाठी अस्तित्वात आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. पाणी उपलब्ध असूनही वितरणात अकार्यक्षमता, नियोजनाचा अभाव आणि टाळाटाळीची वृत्ती यामुळे शहरवासीयांना तहानलेले राहावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने जागे होऊन नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर उसळणार, यात शंका नाही.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.