पैठणमधील अनधिकृत कला केंद्राविरोधात उफाळला संताप; ग्रामस्थांचा जलसमाधीचा इशारा

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत कुलस्वामिनी कला केंद्रा विरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. सरपंच योगेश कोठुळे व उपसरपंच भास्कर गिते यांनी यासंदर्भात सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
शनिवारी तहसीलदार ज्योती पवार, मंडळ अधिकारी वैशाली बैनवाड, तलाठी सुनील मोळवणे यांनी वादग्रस्त कला केंद्राला भेट देऊन कागदपत्रांची झाडाझडती घेतली. या पाहणीत केंद्र पूर्णपणे विनापरवानगी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाझर तलावात आंदोलनाच्या माध्यमातून सामूहिक जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा लक्षात घेता पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी तलाव परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
अनेक गावांचा वाढता पाठिंबा
देवगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाला रजापूर, कडेठाण, आडूळ खुर्द, आडूळ बु., गेवराई आगलावे, ब्राह्मणगाव, हिरापूर-थापटी तांडा आदी गावांतील सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढली असून प्रशासनावर दबाव अधिक वाढला आहे.
कारवाईची टांगती तलवार
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासणीत संबंधित कला केंद्राकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निष्कर्षासह अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असून त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या जलसमाधीच्या इशाऱ्यामुळे आता प्रशासनासमोर हा प्रश्न सोडवण्याची तातडीची वेळ आली आहे. गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.