श्रद्धेला धक्का.! श्रीक्षेत्र आन्वा येथे शिवभक्तांचा आक्रोश उसळला!
पोलीसांचा पहारा असूनही पुन्हा घडला निंदनीय प्रकार

भोकरदन:
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र आन्वा गावातील पुरातन शिवमंदिरात तीन दिवसांत दोनदा मांस सापडणे हा केवळ “प्रसंग” नसून धार्मिक भावना दुखावणारा घातक डाव आहे. मंदिर म्हणजे श्रद्धेचं केंद्र, आस्था आणि संस्कृतीचं प्रतीक. त्या मंदिरात पुन्हा पुन्हा अशा अपवित्र गोष्टी सापडणे हे निश्चितच गावकऱ्यांच्या रोषाला कारणीभूत आहे.
प्रश्न असा आहे की, शुक्रवारी घटना घडल्यानंतर रविवारी तीच घटना पुन्हा कशी घडली? दोन पोलीस कर्मचारी तैनात करून प्रशासनाने केवळ “कर्तव्य निभावले” असा आभास दिला, पण प्रत्यक्षात सुरक्षेत मोठा त्रुटीबिंदू स्पष्ट झाला आहे. जर श्रद्धेच्या ठिकाणीच प्रशासन निष्क्रिय असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत नाही का?
गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून व रास्ता रोको करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रोश हा फक्त भावनिक नाही; तो शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधातील तीव्र प्रतिक्रिया आहे. “दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन उग्र करू”ही मागणी आता गावकऱ्यांत जोर धरत आहे.
आन्वा प्रकरण प्रशासनासाठी धडा ठरायला हवा. अन्यथा अशा घटनांमुळे केवळ धार्मिक सलोखा धोक्यात येणार नाही, तर कायदा-सुव्यवस्था राखण्याचं सरकारचं वचनही धुळीस मिळेल. श्रद्धेवरचा घाव सहन केला जाणार नाही, हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे.
पोलिसांची धावपळ
शुक्रवारीच झालेल्या घटनेनंतर सुभाष बाबुराव हजारे यांच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेऊन मंदिर परिसरात दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळी पुन्हा मांस सापडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संशयाची सावली?
मंदिरात मांस सापडल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ग्रामस्थांच्या मते, दोन दिवसांत दोनदा घटना होणे हा अपघात नसून सुनियोजित कट असू शकतो. शनिवारी नियुक्त केलेले पोलीस असूनही घटना घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले जात आहे.
पुढील दिशा
गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, दोषींवर कठोर कारवाई आणि तपास न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. श्रद्धास्थानाच्या सुरक्षेसंदर्भात प्रशासन कसोटीवर आले असून पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.