“नेपाळसारखी परिस्थिती निर्माण झाली तर जबाबदार सरकार – रविकांत तुपकरांचा थेट इशारा”

संग्रामभूमी वृत्तसेवा:
शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय! एकीकडे कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सरकार हात झटकतंय, तर दुसरीकडे अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाकारून त्यांची चेष्टा केली जातेय. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दरम्यान कर्जाच्या खाईत शेतकरी खोलवर रुतत चालला आहे. या अन्यायाविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सरकारला थेट इशारा दिला आहे.
“जर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार नाही, तर त्यांच्या संयमाचा बांध तुटेल. मग शेतकरी मंत्र्यांना तुडवू तुडवू हाणतील, यात आश्चर्य वाटायला नको!” — तुपकरांचा हा संतापाचा सूर सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार प्रहार करणारा आहे.
त्यांनी पुढे महाराष्ट्रातील स्थितीची तुलना थेट नेपाळसारख्या अस्थिर परिस्थितीशी केली. “लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते आम्हाला दिलंय. मग आमचं तोंड बंद करण्याचा सरकारला अधिकार नाही. जर कारवाई केली, तरी आम्ही भीक घालणार नाही,” असं ते ठामपणे म्हणाले.
आज शेतकरी रात्रंदिवस राबराब राबतोय, तरी उध्वस्त आहे, पिकवलेला शेतमाल घेवून बाजारात जातोय तरी लुबाडला जातोय. सरकारच्या गच्चीवरून मात्र ‘उद्याच्या स्वप्नांचे गोडवे’ ऐकवले जात आहेत. प्रत्यक्षात कर्जमाफी नाही, पिकाला भाव नाही, विम्याची मदत नाही… मग शेतकरी न्याय मागणार नाही तर काय करणार?
सरकारने आता तरी शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून खरी मदत द्यावी, अन्यथा संतप्त शेतकऱ्यांचा ज्वालामुखी फुटायला वेळ लागणार नाही हारविकांत तुपकरांचा स्पष्ट संदेश आहे.