“भोकरदनमध्ये मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांच्या अडचणींत भर”
"आठवडी बाजारपेठ पावसात जलमय; विक्रेते, ग्राहक व नागरिकांची तारांबळ"

भोकरदन:
शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भोकरदन शहर आणि तालुक्यातील काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांवर पावसाची झोड बसत असून, नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिणामी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे भोकरदन शहरातील शनिवारच्या आठवडी बाजारात विक्रेते, ग्राहक व नागरिकांची मोठी तारांबळ झाली. काही मिनिटांतच रस्त्यांवर पाणी साचल्याने बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मात्र, या पावसामागे केवळ शहरातील बाजारपेठेची धांदल नाही, तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतमाल आणि पिकांचे नुकसान ही अधिक गंभीर बाजू आहे. आधीच अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाचा कोप सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे राज्यात पाच दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 27 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच शेतकरी, नागरिक आणि प्रशासन यांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.