मुसळधार पावसाने भोकरदन शहरात धुमाकूळ; माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाहणी

भोकरदन :
भोकरदन शहरासह तालुक्यातील अनेक भागात शनिवारी दुपारी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत मुसळधार कोसळत राहिला. या अवकाळी आणि झडासारख्या पावसाने संपूर्ण भोकरदन शहरात धुमाकूळ घालत मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत केले. तळेकर वाडी, रफिक कॉलनीसह शहरातील अनेक भागात शेती, घरे आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. परिणामी शेतकऱ्यांपासून ते व्यापारी, गृहस्थांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शेती आणि घरांचे मोठे नुकसान
तळेकर वाडी परिसरात पाण्याच्या लाटांनी शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली. तर रफिक कॉलनी भागात घरे व दुकाने यामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंसह व्यावसायिक साहित्यही नष्ट झाले.
अंडरग्राउंड दुकाने जलमय
शहराच्या मुख्य रस्त्यावरील अंडरग्राउंड दुकानांमध्ये रात्रीभर पावसाचे पाणी साचले. यामुळे व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रविवारी सकाळपर्यंत या भागात पाणी काढण्याचे काम सुरू होते. व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची पाहणी
रविवारी सकाळी या सर्व परिस्थितीची पाहणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली. त्यांच्या सोबत तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन तायडे, तलाठी भाऊसाहेब सोनवणे, माजी नगरसेवक प्रा. रणवीरसिंह देशमुख, भाजयुमोचे शहराध्यक्ष दिपक पाटील मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
पंचनाम्यांचे आदेश
नुकसानीची माहिती घेतल्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच झालेल्या नुकसानीचे न्याय्य मूल्यांकन व्हावे यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे,” असे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, पावसामुळे शहरात अद्यापही अनेक ठिकाणी चिखल व पाणथळ परिस्थिती असून नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी नाल्यांची क्षमता वाढवावी आणि शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे.
