“बाळा, तुझ्या काळजीसाठी नाही जाऊ दिलं… पण कायमचं दूर गेलास!”
फिरायला जाण्यास नकार; 16 वर्षीय मुलाचं टोकाचं पाऊल ; लेहा गावात हळहळ

भोकरदन : “बाळा, तुझ्या काळजीसाठीच नाही जाऊ दिलं, मग असं का केलंस?”… आईचा हा हुंदका ऐकून लेहा गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. एका छोट्याशा हट्टामुळे आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा कायमचा दूर गेल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (27 सप्टेंबर) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लेहा गावात घडली.
फक्त 16 वर्षांचा नैतिक सदाशिव सोनवणे, दहावीचा हुशार विद्यार्थी. काही दिवसांपासून तो आपल्या मित्रासोबत तुळजापूरला दर्शनासाठी जाण्याची तयारी करत होता. आई-वडिलांनी त्याला प्रेमाने समजावलं “पाऊस उघडल्यावर आपण सगळे सोबत जाऊ.” पण मुलाच्या मनात मात्र हट्ट पक्का होता. वारंवार परवानगी मागूनही नकार मिळाल्यावर नैतिकनं आयुष्य संपवायचं ठरवलं.
शनिवारी दुपारी आई-वडील शेतात भुईमुग शेंगा तोडण्यात मग्न होते. आजोबा गावातील एका अंत्यविधीसाठी गेले होते. घरात एकटाच राहिलेल्या नैतिकनं दोरीचा फास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. काही वेळाने घरी परतलेल्या आजोबांच्या नजरेस हा हृदयद्रावक प्रसंग आला. दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. शेजाऱ्यांच्या मदतीने नैतिकला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
ही बातमी कळताच शेतात काम करणारे आई-वडील धावत आले. घराच्या अंगणातच त्यांचं जग उद्ध्वस्त झालं. मुलाच्या देहाजवळ कोसळलेल्या आईचा हंबरडा – “बाळा, तुझ्या काळजीसाठीच नाही जाऊ दिलं रे… आता मात्र आयुष्यभराचं दुःख देऊन गेलास” गावकऱ्यांना पिळवटून गेला. वडिलांचे डोळेही अश्रूंनी धुसर झाले. एकुलत्या मुलाच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावभर हळहळ व्यक्त होत आहे.