भोकरदन तालुक्यात आभाळ फाटलं; शेतकऱ्यांची स्वप्नं पाण्यात, व्यापाऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान

भोकरदन
भोकरदन तालुक्यात शनिवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरा रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण तालुका अक्षरशः जलमय झाला. रात्रभर कोसळलेल्या या मुसळधार पावसाने शेतं-शिवार उद्ध्वस्त केली, तर शहरातल्या व्यावसायिकांनाही कोट्यावधींचा फटका बसला.
शेतकरी वर्गाचे नुकसान इतके मोठे आहे की, अनेकांच्या शिवारात कंबरेइतके पाणी साचल्याने पिकं वाहून गेली. काहींच्या शेतातलं आयुष्यभराचं श्रमदान एका रात्रीत पाण्याच्या लाटेत गडप झालं. “आता पुढे कसं जगायचं?” हा हृदयविदारक प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे. शिक्षण, लग्न, कर्जफेड—साऱ्या जबाबदाऱ्या डोक्यावर असताना, हतबल झालेला शेतकरी शासनाकडे मदतीसाठी आस लावून बसला आहे.
शहरातल्या व्यापाऱ्यांचीही कहाणी वेगळी नाही. जालना रस्त्यावरील कॉम्प्लेक्समधील अंडरग्राउंड दुकाने अक्षरशः तळ्यात रूपांतरित झाली. कमरेएवढं पाणी दुकांमध्ये घुसून मालसामानाची राखरांगोळी केली. रविवारी पहाटेपर्यंत पंपांच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला, पण तोपर्यंत लाखोंचे नुकसान व्यावसायिकांच्या माथी मारलं गेलं होतं.
रविवारी सकाळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी घटनास्थळांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी व व्यापाऱ्यांच्या भेटी घेत तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. तसेच शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना भेट देत पाहणी केली.
या आपत्तीमुळे गावागावात हताशतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत चिंता, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हतबलता आणि मनात “आता पुढे काय?” हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या संसाराची शान असलेली जनावरं पावसाच्या पाण्यात वाहून गेली आणि मृत्यूमुखी पडली. गावोगाव नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते. पूराच्या पाण्याच्या प्रचंड लोटांमध्ये शेतकऱ्यांची बैलं, गायी, म्हशी, वासरे अशी अनेक जनावरे वाहून गेली. काही ठिकाणी जनावरं पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा फुटल्या. आयुष्यभर जपलेली जनावरं क्षणार्धात निसटून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलं नाही. एकीकडे उभं पीक वाहून गेलं, दुसरीकडे घर चालवणारी जनावरं दगावली. “शेती गेली, जनावरं गेली… आता संसार कस चालवायचा?” हा प्रश्न शेतकऱ्यांना वेड लावणारा ठरत आहे. लग्न, शिक्षण, रोजच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न तर आहेतच; पण आता जनावरं नसल्याने शेती कस करायची? हा नवीन अडसर निर्माण झाला आहे.
शासनाने या दुर्दैवी संकटावर तातडीने मदतीचा हात न दिल्यास शेतकरी व व्यापारी आर्थिकदृष्ट्या उभे राहणे कठीण होईल, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.