महाराष्ट्र

“तिखट मिरचीने गोड समृद्धी – वरूड बु.च्या विलास भारतींचा संघर्षातून यशाकडे प्रवास”

भोकरदन:
“शेतीतून काहीच होत नाही, शेतकरी कायम कर्जातच राहतो” असा एकेकाळी लोकांचा समज होता. पण भोकरदन तालुक्यातील वरूड बु. या खेड्यातील विलास कैलास भारती या तरुण शेतकऱ्याने हा समज मोडून काढला आहे. एकेकाळी घरासमोर सायकलसुद्धा नसलेला हा तरुण आज मिरचीच्या आधारावर मोठ्या बंगल्यात राहतो, दोन ट्रॅक्टर, दुचाकी आणि आधुनिक साधनसंपन्न शेतीचा मालक झाला आहे.

विलास भारती यांचे बालपण साधेपणात गेले. पाण्याची टंचाई, अपुरे साधनसंपन्न शेत आणि बाजारपेठेतील चढउतार या सगळ्या संकटांना तोंड देताना त्यांना शेती सोडावीशी वाटली होती. पण “पारंपरिक पिकांत अडकून राहून काही बदल होणार नाही” हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी २०१८ पासून जोखीम पत्करून मिरची लागवड सुरू केली.

नियोजन आणि अभ्यासाचे फळ
भारती कुटुंबीय दरवर्षी २५ एप्रिललाच म्हणजे हंगामाच्या २० दिवस आधी लागवड करतात. उन्हाच्या कडकडीत केलेली ही मेहनत त्यांना सोन्यासारखा भाव देऊन जाते. कारण मिरची बाजारात लवकर पोहोचते, स्पर्धा कमी असते आणि व्यापारी जास्त दर देतात.
त्यांनी माती परिक्षण, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि शेततळे या आधुनिक तंत्रांचा योग्य वापर केला. विजेच्या अडचणीवर मात करण्यासाठी सोलार पंप बसवले. या सर्व उपाययोजनांमुळे उत्पादनात आणि नफ्यात दोन्ही ठिकाणी झपाट्याने वाढ झाली.

खर्च उत्पन्नाचे गणित यंदा त्यांनी चार एकरवर मिरची लावली.
प्रति हेक्टर खर्च : ₹१,४५,०००
प्रति एकर खर्च : सुमारे ₹५८,८००
तीन महिन्यांत उत्पन्न : हेक्टरी १५ लाखांपर्यंत
सध्याचे उत्पन्न : २३ लाख रुपये; अजून १० लाखांची अपेक्षा हे आकडे सांगतात की, मेहनत आणि नियोजन असेल तर शेतीही करोडोची स्वप्नं साकार करू शकते.

परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
आज वरूड बु. गावातील आणि परिसरातील अनेक शेतकरी विलास भारती यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. त्यांच्या सल्ल्याने अनेकांनी मिरची लागवडीकडे वळून चांगला नफा कमावायला सुरुवात केली आहे. स्वतःचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या या पद्धतीने आता इतरांचंही जीवन उजळू लागलं आहे.

शेतकऱ्यांना संदेश..
विलास भारती यांची गोष्ट फक्त एका शेतकऱ्याची यशकथा नाही, तर हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. संकटांवर मात करून, काळाच्या पुढे पाहून, विज्ञानाचा वापर करून शेती केली तर शेतीही सोने उगवू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.