भोकरदन-जाफराबादला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी – माजी आमदार चंद्रकांत दानवे

भोकरदन :
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याचा समावेश ओला दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केली आहे.
अलीकडील अतिवृष्टीमुळे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र शासनाच्या याद्यांमध्ये या दोन्ही तालुक्यांचा ओला दुष्काळग्रस्त म्हणून अद्याप समावेश झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चंद्रकांत दानवे यांनी स्पष्ट केली.
फक्त शेतकरीच नव्हे तर शहरातील व्यापारी व नागरिक यांनाही पुरामुळे मोठा फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे उपविभागीय कार्यालय, भोकरदन येथे लवकरच भव्य शेतकरी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.
भोकरदन येथे दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत युवक तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. अंकुश जाधव यांनी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांच्या नुकसानीचे वास्तव मांडले. यावेळी तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, संग्रामराजे देशमुख, शफिक शेठ पठाण, पंढरीनाथ पवार, माजी नगरसेवक अब्दुल कदीर बापू, गंगाधर कांबळे, कांताताई वाघमारे, डॉ.शालिकराम सपकाळ,पंढरीनाथ पवार, नसीम पठाण, शमीम भाई मिर्झा, निर्मलाताई भिसे, रामदास रोडे, गंगाधर कांबळे, अझर शहा, फैसल चाऊस, शफिक भाई महामंत्री, डॉ. जनार्दन जाधव, रहमान भाई, इसरार पठाण, रावसाहेब दाभाडे, मुजिब कादरी, रघुनाथ पांडे, दादाराव साबळे, रमेश बरडे, किसन खडके, सुभाष पोटे, बबनराव शिंदे, दत्ता पुंगळे, कारभारी टेपले, भीमराव भिसे, छगन पंडित, पंडितराव पडोळ, कौतिकराव तांगडे, मसूद शहा, किसन खडके, प्रा. रामदास गव्हाणे, बळीराम ठाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.